नुकतेच मुंडण केलेल्या
बटूच्या
डोक्याप्रमाणे
गोमटेपणा मिरवणार्या
पिंपळाने
केली सुरू तपश्चर्या ...
सूर्याचे पुढे ठाकलेले
आव्हान झेलण्यासाठी ...
तेव्हा झाली कृपा
त्यावर
पृथ्वी आणि जळाची !
दिसू लागली प्रभावळ
त्याच्या भोवती पालवीची !
पालवी ...
भूमीच्या रंगाची,
पाण्यासारखी तजेलदार !
अद्वैताचा झालेला हा स्पर्श
जेव्हा सांभाळू लागेल जीवन-तत्व,
हिरव्या पर्णसंभारातून ..
तेव्हा
सूर्याचे असंख्य असह्य किरण
शोषून घेत हा पिंपळ
होत राहील उतराई
भूमी आणि जळाप्रत
त्यासाठी,
त्यांनी केलेल्या कृपेतूनच
देत राहील
गारवा आणि आसरा
रणरणत्या उन्हाच्या
वैराणातही !
आणि मग करील आवाहन
मेघांना ..
अधिक सामर्थ्याने
या दाहकतेवर
जलतत्वाचे अखंड वर्षाव
घडवण्यासाठी !
जीव-सृष्टीच्या
कल्याणाचा एक आश्रम
अविरत चालवणारा
योद्धा ऋषी ...
हा पिंपळ !
No comments:
Post a Comment