Search More Kavita, Katha, Charolya..

संगतीचा परिणाम (Marathi Bodh Katha)

संगतीचा परिणाम  



एका गावाबाहेर चिंचेचे एक मोठे झाड होते. त्या झाडाला खूप चिंचा लागत असत. त्या झाडाची सावली वाटसरुंना गारवा देत असे. ते झाड इतके विचारी होते की आपल्या पिकलेल्या चिंचा ते स्वत: होवून खाली पाडून टाकत असे. वाटसरू अशा चिंचा घेवून जात. त्यातील कांही चिंचोके कुठे ना कुठे, कधी ना कधी रुजत असत, उगवत असत आणि त्यातील कांहीचे मोठे झाडही होत असे. जिनेटिक गुणांमुळे या नवीन उगवणा-या झाडांचा माइंडसेटही त्या गावाबाहेरच्या चिंचेच्या झाडासारखाच परोपकारी, सात्विक, पॉसिटिव्ह थिंकिंग करणारा असे.

पण संगतीच्या परिणामामुळे एखाद्याचे चांगले मूळ गुण कसे मार खातात त्याची ही कथा आहे.

एके दिवशी एका कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले.  त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.'

'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'.

हे ऐकून बाभळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची कीव करावीशी वाटली. ते रागाने म्हणाले, 'तू प्रतिगामी आहेस. तुझे माणसीकरण झाले आहे. तू असा आहेस. तू तसा आहेस'.

चिंचेच्या झाडाने त्याचे म्हणणे कांही मनावर घेतले नाही. पण बाभळीच्या झाडाचे पालुपद रोजच चालू असे. ते रोज कांहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असे.

एके दिवशी ते म्हणाले, 'या माणूस नावाच्या प्राण्याने जगभर झाडांची कत्तल चालवली आहे. या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे.' झाडांच्या कत्तलींचा मुद्दा ऐकून चिंचेचे झाड थोडे हबकले.

आणखी कांही दिवसांनी बाभळीचे झाड खोटेच म्हणाले, ' अरे तुला कळले का, आता माणसे चिंचेच्या झाडांची कत्तल करायला लागले आहेत'.

आता मात्र चिंचेचे  झाड निराश झाले. त्याला माणसांचा राग यायला लागला. या माणूस नावाच्या प्राण्याला धडा शिकवायचाच असे त्याने ठरवले. काय करावे बरे? त्याला एक आयडीया सुचली. तो आपले मूळ विचार, मूळ गुण विसरून गेला. त्याने ठरवले,  आपल्या अंगाला चिंचा लागतात, म्हणून माणसे ती खायला येतात. आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसे आपल्या सावलीत विसावा घेतात. आता आपण आपल्या अंगाला चिंचाच  लावून घ्यायच्या नाहीत. आपली सगळी पाने गाळून टाकायची, म्हणजे सावलीच पडणार नाही. असे केले तर ती माणसे आपल्याकडे कशाला फिरकतील? हे विचार त्याने लगेच अमलात आणले. त्या झाडाची सगळी पाने कांही झाडून गेली. त्या झाडाला आता चिंचा लागेनात. कांही महिन्यातच ते झाड खंगून गेले. वाळले. मेले.

आत्तापर्यंत चिंचेच्या सावलीमुळे नीट वाढ होत नसलेले ते बाभळीचे झाड मात्र चांगलेच फोफावू लागले.

No comments:

Post a Comment