अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....
तुकुतुकू ग्रहावरून आलेल्या त्या एलियनने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचे ठरवले होते. त्याने आता पुण्याकडे आपला मोर्चा वळवला. एका अमेरिकन इतिहास संशोधकाच्या रुपात तो पुण्यात अवतरला. इतिहासाची आवड असणा-या कांही टिपिकल पुणेरी लोकांशी त्याने मैत्री केली. त्याने मित्र निवडताना ज्यांच्या चेह-यावर प्रचंड तुच्छताभाव दिसत होता असेच नमुने निवडले. असे करण्याचे कारण म्हणजे त्याच्या तुकुतुकू ग्रहावर या प्रकारचे स्वत:ला फारच शहाणे समजणारे लोक होते, त्यांच्याशी यांचे काय साधर्म्य आहे हे त्या एलीयनला बघायचे होते. अर्थातच असे मित्र गोळा करायला त्याला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.
एके दिवशी त्याचा एक पुणेरी मित्र आपली नसलेली छाती फुगवत त्याला म्हणाला, "तुमच्या अमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास आहे, पण आमच्या भारताला 5000 वर्षांचा इतिहास आहे". हे ऐकताच तो एलियन म्हणाला, "हो, आणि तुमच्या महाराष्ट्राला तर फक्त साडे तीनशे वर्षांचाच इतिहास आहे".
एलियनचे हे मत ऐकल्यावर त्या पुणेकराची छाती एकदम आतच गेली. मग तो एलियन म्हणाला, 'अरे मित्रा, तुला तुझ्या महाराष्ट्राचा 350 वर्षापूर्वीचा इतिहास माहीत नाही, मग अमेरिकेचा 500 वर्षांपूर्वीचा इतिहास कसा काय माहीत असणार? तुझे अज्ञान मी समजू शकतो. अरे, तू जेंव्हा अमेरिकेला 500 वर्षांचाच इतिहास आहे असे म्हणतोस, त्यावेळी तुला युरोपिअन लोक अमेरिकेत गेले आणि तेथे वसले एवढेच माहीत असते. पण त्या अगोदरही तेथे लोक होते आणि त्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे हे तू विसरतोस. तुझ्यासारख्या बुद्धिमान टोळीचा वारसा असलेल्या माणसाला हे अज्ञान शोभत नाही".
हे ऐकताच तो पुणेकर तरातरा निघून गेला. पुढे तो एका इतिहास विध्वंसक मंडळात त्या एलियनला दिसला होता. एका कर्नाटकी माणसाला म्हणत होता, "आमच्या महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल या दोन्ही गोष्टी आहेत, तुमच्या कर्नाटकाला फक्त भूगोलच आहे".
एलियनची आता पक्की खात्री झाली की हे टिपिकल पुणेकर कधीच सुधरू शकत नाहीत. तुकुतुकू ग्रहावरील त्या रानटी गो-या टोळ्यांशी यांचे फारच साम्य आहे हे त्याला आता कळून चुकले होते.
No comments:
Post a Comment