Search More Kavita, Katha, Charolya..

आखूड शिंगी, लांब मान्या

आखूड शिंगी, लांब मान्या


'अभिताभ बच्चन' म्हणजे लांब मान्या, लंबू टांग जिराफ. मोकळा फिरताना सारखी मान वेळावत कुठे तरी दूरवर न्याहळत असतो. त्याचे कुतूहलपूर्वक पाहणारे डोळे जमिनीपासून ५ ते ६ मीटर उंचीवरून परिसराचा वेध घेतात. मान चारही दिशांना फिरते. त्यामुळे त्याच्या दृश्य क्षेत्राचा विस्तार खूपच मोठा असतो. त्याची उंची भरते ५ ते ६ मीटर. नर जास्त उंच असतात. नराचं वजन सुमारे २000 किलो आणि मादीचं १000 किलोपर्यंत असतं. मान सोडून उरलं शरीर आखूड असतं. जिराफाची श्रवणक्षमता खूप असते. त्याचप्रमाणे घ्राणेंद्रियंही संवेदनक्षम असतात. जिराफाला दीर्घ काळ नाकपुड्या बंद करता येतात. त्यामुळे गरम वाळूची वादळं आणि मुंग्यांसारखे उपद्रवी कीटक यांच्यापासून रक्षण करता येतं. जीभ खूप लांब असते. ती उंच काटेरी फांद्यांवरचा पाला खाताना छोट्या फांद्यांना विळखा घालू शकते. नाक साफ करायला तिचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे अंग स्वच्छ करायलाही ती उपयोगी पडते. जिभेचा रंग गर्द तपकिरी काळपट असतो. त्यामुळे सूर्य तपासून तिचं रक्षण होऊ शकतं.
जिभेप्रमाणेच वरचा ओठ थोडा लांब व खूप लवचिक असल्याने तो पाला तोडायला मदत करतो. शिवाय, जिभेवर, ओठात आणि तोंडाच्या त्वचेवर निबर उंचवटे असतात. त्यामुळे झाडांच्या टोकदार काट्यांपासून संरक्षण मिळतं.
मोठाले नारिंगी, तपकिरी किंवा काळपट ठिपके आणि त्याभोवतालचे फिके पिवळे आणि पांढरे मऊ केस यांमुळे जिराफ खूप आकर्षक दिसतो. ठिपक्यांखालच्या त्वचेत रक्तवाहिन्यांचं दाट जाळं असतं. त्यामुळे शारीरिक तापमान संतुलित ठेवता येतं. मोठय़ा धर्मग्रंथीही त्यासाठी मदत करतात. अंगाच्या विशिष्ट तीव्र वासामुळे कृमिकीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. त्वचेतून एकूण अकरा रासायनिक द्रव स्रवतात. त्यात इंडोल व इ-मेथिलींडोल यांचा मोठा भाग असतो. नरांचा शरीरगंध जास्त तीव्र असतो. लैंगिक मिलनासाठी तो आकर्षक ठरतो. जिराफाचं शेपूट साधारण एक मीटर लांब असते. त्यामुळे माश्यांसारखे उपद्रवी कीटक मारता येतात. डोक्यावर दोन आखूड शिंगं असतात. लढाईसाठी लांब मांसल दणकट मान खूप उपयोगी पडते. झुंजीत मानेचा जोरदार रेटा महत्त्वाचा ठरतो. त्यात कधी मान दुखावतेसुद्धा. मृत्यूही ओढवतो.
लांबलचक पायांचा उपयोग झेपा घेत वेगाने पळण्यासाठी होतो. पळताना मागचे पाय पुढच्या पायांपुढे आधी टेकतात. मग पुढचे पाय जागा सोडतात. त्या वेळी तोल सांभाळायला लांब मानेचे लयीतले झोके उपयोगी पडतात. धावताना वेग एका क्षणात वाढवता येतो. तासाला साठ कि. मी. अशी गती पकडता येते. घोड्यांप्रमाणेच जिराफ उभ्यानेच झोपू शकतो; पण जमिनीवर लोळण घेऊन तो ४-६ तास झोप काढतो. पाणी पिण्यासाठी त्याला पाणवठय़ाजवळ पाय फाकून, मान वाकवून पाणी प्यावं लागतं. मानेची लांबी दोन मीटर असली, तरी मणक्यांची संख्या आठच असते. मात्र, प्रत्येकाची लांबी सुमारे २८ सेंटिमीटरपर्यंत भरते. मानेची लांबी वाढत्या वयाबरोबर वाढत जाते. मानेसाठी जिराफाला जादाचा आठवा मणकाही लाभलाय.
मान वाकवली, की डोक्यातला रक्तदाब वाढू नये आणि एरवी उंचीवरच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा व्हावा, अशी झडपांची व्यवस्था हे जिराफाचं वैशिष्ट्य आहे. हृदयाचे स्नायूही खूप बळकट असतात. त्यामुळेच लांब मान्या, लंबू टांग जिराफाचा पळतानाही निभाव लागतो. रक्तदाबाचं नियंत्रण होतं.

No comments:

Post a Comment