गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी
पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता. त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''
अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले. सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही. सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले. रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत पाणी आले.
मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण निर्माण होऊ दे.'
No comments:
Post a Comment